पुन्हा गोनीदां ! 'पडघवली' , 'जैत रे जैत' नंतर गोनीदांची लाघवी बोली न्याहाळत राहावी अशीच वाटते. धोंडीबद्दल सुरुवातीपासून एक उत्सुकता होती. प्रवाहासोबत वाहायचं नाकारणाऱ्याला धोंडीला प्रत्येकाने भेटलं पाहिजे असं वाटतं. १७ जून २०२१ रोजी 'पवनाकाठचा धोंडी' हे 'गो. नी. दांडेकर' यांचं पुस्तक वाचलं. मराठी साहित्यातील आणखी एका अप्रतिम कलाकृतीचा आस्वाद घेतला. 'धोंडी' हे या कथेतील एक पात्र. जरा पत्र वगैरे लिहून हवालदारांचा मान पान करू म्हटलं !!
डिअर धोंडी ,
प्रत्येक वाचकाला हेवा वाटावा असा तू 'धोंडी'. पवन मावळात तुला इतका मानपान का आहे हे कळायला प्रत्येकाला धोंडी हवालदार म्हणून एक दिवस तरी जगता आलं पाहिजे. धोंडी , दुसऱ्याचं रान पडू नये म्हणून इरजीक बेतणारा तू जेव्हा स्वतःच्या रानात स्वाभिमानापोटी स्वतः बैलासारखा खपतोस आणि त्याच काळ्या आईच्या कुशीत श्वास सोडतोस तेव्हा खरंच तुझा हेवा वाटतो. तुंगी गडाचा मनापासुन , निस्वार्थीपणे सांभाळ करतोस ; मोबदला एवढाच की लोकांनी तुला 'हवालदार' म्हणावं , तुझी विचारपूस करावी , गड पाहायला तुझी परवानगी घ्यावी ! सरकारकडून तुला मिळतो त्याला नजराणा समजून , इतक्या वर्षांनंतरही अगदी गर्वाने शिवाजी राजाच्या ऋणात जीवन जगणारा तू पवना नदीतला मोतीच जणू !
कोंडीला लेकरासारखं पोटाजवळ घेतलंस , सारजेनं तर कोंडीसाठी काय नाही केलं ! पण ; तो तुझ्यापेक्षा फार वेगळा. तुझ्यासारखं तत्वांसाठी रक्त जाळायला त्याला काय , कुणालाच जमायचं नाही. कोंडी पुढल्या जगात राहणारा माणूस. स्वतःचा दुधधंदा करून त्याने पैसे मिळवले खरे पण ; गोरस विकणं हे पाप आहे असं जेव्हा तू सांगतोस तेव्हा तुझी जनावरांवरची माया कळते. सारजेवर तुझा कितीतरी जीव ; तिची शेवटची घटका पाहिलीस तू पण , कोंडीचा पाण्याचा एक पैसा घेतला नाहीस. म्हणूनच काय ते 'कोंडी ढमाले' म्हटलं की लोकं इब्रतीनं वागतात.
सरू सारखी पोर घरात आणून तिला तू जी माया , आपलेपणा आणि जबाबदारी दिलीस त्यावरून कळतं घराचं वात्सल्य चिरंतर राहावं म्हणून इतकी वर्षं किती राब-राब राबलास.
धोंडी , तुझ्यातला स्वाभिमान , तुझ्यातला ठामपणा , तुझ्यातलं प्रेम , तुझी मेहनत , तुझ्या मनाचा मोठेपणा , तुझं तत्वनिष्ठ जगणं सारं-सारं प्रत्येक वाचकाला तुझ्यावर प्रेम करायला भाग पाडतं. तू प्रवाहासोबत वाहत नाहीस खरा पण ; तुझ्या 'असण्या'वर तटस्थपणे ठाम राहतोस हे भारी थोरपण आहे तुझं !
( ऋण : वीना देव , विजय देव , मधुरा देव , रुचिर कुलकर्णी )
सदैव नमन 'गोनीदां' _/\_

No comments:
Post a Comment