Showing posts with label Book review. Show all posts
Showing posts with label Book review. Show all posts

Friday, December 8, 2023

'ओह माय गोडसे'


                              मी अकरावीत असेन तेव्हा एक प्रयोग खूप बंदोबस्तात झाला , तेव्हा आलेल्या वर्तमानपत्रातील बातमीमुळे नाटक डोक्यात घर करून होतं ; आत्ता योग आला होता, पाहण्याचा !

                              18 नोव्हेंबरला बुक माय शो चाळताना सहजच लक्ष गेलं केशवराव भोसले नाट्यगृहात येऊ घातलेल्या पुढील प्रयोगांवर. नजर खेळून राहिली ती नथुराम गोडसे च्या प्रयोगावर. त्यापूर्वी मी माझ्या मित्र परिवारात या नाटकाबद्दल विचारणा केली काही ठिकाणी नथुरामी वृत्तीचा सक्त विरोध केलेला पाहायला मिळाला तर काही ठिकाणी 55 कोटी , गोपाळ गोडसे , फाळणी , इत्यादी , इत्यादी. त्यासोबतच मी या नाटकाचे पूर्वी उमटलेले पडसाद पहावे म्हणून युट्यूब वगैरे माध्यमांचा आधार घेतला. जेव्हा नाटक आलं आणि पुढचा एक सात-आठ वर्षांचा काळ ते गाजत होतं त्यादरम्यान पाहिलेल्या व्यक्तींशी संपर्क केला. मला सर्वांगाने कुठेच नाटकाचे निरीक्षण-परीक्षण ऐकायला वा वाचायला मिळाले नाही.

                                विनायक ची आठवण झाली. असे डोकं भांबावून सोडणारे प्रश्न सोडवणं त्याला भारी जमतं (याचे लहान सहान अनुभव मी स्वतः घेतले त्यामुळे). थोडक्यातच सांगते. विनायकची आणि माझी ओळख ; विवेकानंद महाविद्यालयात मी अकरावीला होते , विनायक तेव्हा पदवीच्या दुसऱ्या वर्गात होता. तेव्हा व्हाट्सअप वर एक मेसेज फिरत होता ज्यात विवेक वाहिनीशी जोडले जाण्यासंदर्भात माहिती होती. संपर्क म्हणून खाली विनायकचा नंबर होता. मी मेसेज केला आणि मी 'विवेकी गटाशी' कायमची जोडले गेले. ब्लॉग राइटिंग बद्दल मला विनायकनेच सांगितलं होतं. त्याचे ब्लॉग नंतर 'फिलिंग अस्वस्थ' या लेखसंग्रहाच्या रूपाने आपल्याला वाचायला मिळालेच. विनायकचं लिखाण , व्याख्याने , चळवळ हे सर्व आता एका स्वतंत्र उंचीवर येऊन पोहोचले होते ; दरम्यान त्याचं 'ओह माय गोडसे' हे पुस्तक मी फार ऐकून होते. म्हणून ; संबंधित नाटकाबद्दल विनायकशी मतमतांतर झाले.

                                खरंतर मी पाच-सहा वर्षांपूर्वी गोपाळ गोडसे वाचलंय , सेवाग्राम ची शिबिरं केलीयत , गांधी रिसर्च फौंडेशनला भेट दिलीय , 'नॉन वायोलेन्स अँड पीस' ची आंतरराष्ट्रीय फेलोशिपही सध्या चालू आहे , सत्याचे प्रयोग लहानपणापासून सोबतच आहे , काही गांधी अभ्यासाच्या कॉन्फरन्स केल्या आहेत , आता मी हे नाटक पाहिलंय आणि आता मी 'ओह माय गोडसेही' वाचलंय !!

                                नाटक हे मनोरंजनाचं एक साधन असतं अशी शालेय वयातील नाटकाची व्याख्या या नाटकाच्या निमित्ताने अधोरेखित झाली ; 'मनोरंजनाचं साधन'. नाटकाबद्दल स्व:मत मांडण्यासारखं त्यात काहीच नाही याची जाणीव झाली ; पण नाटक पाहिल्यानंतर मनापासून एक सांगू वाटतंय ''समोर चालू असणारा थोतांडपणा , भ्याडपणाच्या अस्तरात लपून वार करणारी वृत्ती ; अनुभवायची , पहायची , ऐकायची आणि साहायची शक्ती बापूंच्या जीवनपटाने मला एव्हाना दिलीय''.


पुस्तक :- 'ओह माय गोडसे'
प्रथम आवृत्ती :- 20 जुलै 2019
द्वितीय आवृत्ती :- 30 जानेवारी 2023
पृष्ठसंख्या :- 203
आणि
लेखक :- विनायक होगाडे

                                   मुळातच विनायककडे ओघवत्या भाषेची प्रचंड प्रतिभा आहे. पुस्तक वाचायला घेतलं की , संपलेलं समजत नाही. जे - जे काही वाचू ते - ते समोर दिसायला लागतं. एकूण 17 भागांत लिहिलेलं हे पुस्तक गांधी अभ्यासकच नव्हे तर ; नथुरामअभ्यासकांनीही वाचलं पाहिजे असं मनोमन वाटतं. नथुरामची बाजू त्याच्या जागी जशी इतिहासात आपण पाहिली तशी इथेही त्याच्या मांडणीला जागा दिली आहे आणि गांधींच्या तत्वांवर सखोल आणि सहज भाष्य करण्यात लेखक यशस्वी झाल्याचे दिसून येते.

                                   अभिराम , डॉ.केतन , स्मिता , डॉ.नेहा , निशांत , जेनिफर , गाथा आणि कबीर यांच्या भूमिकेतून नाटकाबद्दलची आणि वास्तविक गांधीहत्येची ; आणि त्यामागील सुप्त हालचालींची चिकित्सक मांडणी वाचल्यावर खरंच मनावरचा ताण आणि डोक्यातले असंख्य प्रश्न दूर व्हायला लागतात.

                                   'गांधी आपल्यातलाच आहे , तुमच्या-माझ्यासारखा' असं जेव्हा सुरुवातीच्या मनोगतात लेखक मांडतात तेव्हाच 'पुस्तक वाचण्याचे कारण' वाचकाला सापडते.

                                    धर्म - परधर्मवाद असो , मोहनदास - गांधी - सावरकर - नथुराम - गांधीवाद असो , हिंसा - अहिंसा असो , शस्त्र - निशस्त्र असो , अखंड हिंदुस्थान - फाळणी असो , बंदूक - चरखा असो किंवा , श्रीराम - रावण - राम असो ; या साऱ्या मुद्द्यांवर गरजेचं असणारं विचारविनिमयाचं काम या पुस्तकातून झालेलं आहे.

                                    अभिरामने गोळ्या झाडल्यावर ; स्मितांचा तो शब्दबद्ध अविष्कार मनाला फार लागतो , बापूंचं शेवटी असं जाणं ; सहन न होणारं आहे याची राहून राहून जाणीव होते. 

                                     इतिहास जाणून घेऊन दाखले मांडणे आणि विवेकाने समजावणे आजच्या  अभिरामांसाठी अत्यावश्यक आहे. आणि 'ओह माय गोडसे' च्या माध्यमातून विनायक तू ते काम चोखपणे करतोयस , याचा आनंद आणि अभिमान आहे. अभिरामच्या डोक्यातील द्वंद्वाला दूर करण्याच्या निशस्त्र लढाईत आणखी कैक तरुण-तरुणी तुझ्यासोबत आहेत , असतील अशी आशा देते आणि या पुस्तकाचे आता अनुवादही व्हावेत अशी ईच्छा व्यक्त करून थांबते.

                                      तर , हे पुस्तक लवकरात-लवकर घ्या , वाचा आणि वाचनानुभव लेखकांपर्यंत पोहोचवा.


                                                                                                                                    
                                                                                                                                             ~ शामल दीपा




 

Monday, February 28, 2022

उल्का

 पुस्तकाचे नाव : उल्का 

प्रकार : कादंबरी

लेखक : वि.स.खांडेकर

प्रथमावृत्ती : १९३४

सद्य प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

पृष्ठसंख्या : १७०



एकूण २५ भागांत रचलेली ' उल्का' कादंबरी ; तिच्याविषयी थोडं काही ,

                 उल्का तत्वं शिकवून जाते. मन भरून येईतोवर प्रत्येक पात्र समोर येऊन बोलू लागतं तेव्हा , जाणीव होते की आपण वाचताहोत ही कलाकृती कल्पित का असेना पण भाव - बंधांच्या प्रवाहात वाहवून नेणारी होडी आहे. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर ' काहीतरी केलं तरंच कर्तृत्त्व राहतं' यापेक्षा ' तत्वानं जगला तर खरा माणूस उरतो ' यावर अधिक विश्वास बसतो.

                 उल्का , तशी साधी , सरळ , सोपी मुलगी ! हुशारी जन्मतःच तिच्यात असावी पण ; भावनांच्या घुसळणीत हुशारी टिकेल कशी हेही तितकंच खरं !

                या कादंबरीत ' उल्का ' नावाची मुलगी , तिचे शिक्षक वडील ज्यांनी पुनर्विवाह केलेला ; तिचे काही सवंगडे आणि कालांतराने आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यांवर समोर येणारे पुरुष ; वसंत , माणिकराव , बाबुराव आणि चंद्रकांत !

                चंद्रकांताची चुणूक भलतीच महान ! तो , त्याची पत्रं , त्याचा समुद्र , त्याचे भाऊ , त्याची उल्का , त्याची कल्पना , त्याचा निडरपणा आणि त्याचं देशप्रेम ; हा सारा प्रवास अस्सा डोळ्यांसमोर घडतोय असा दिसू लागतो.

                कोकणचं , समुद्राचं विसंनी केलेलं वर्णन , भाऊंच्या मतांची अर्थात तत्वांची मांडणी इथपासून ते चंद्रकांताचं अधिक प्रेम कोणावर हे अवघ्या सहा - सात ओळींच्या संवादातून सांगून क्षणात मनाला एखाद्या काट्याचा प्रेमळ ओरखडा उमटतो आणि उल्केप्रति प्रेम निर्माण करून जातो. बाकी इतकंच की , विसंची फार फार ओढ वाटू लागते.


Friday, December 31, 2021

Change your attitude , change your life




Hello dear friends , 

                   As we know Attitude matters most in the life of every living being. So this is the perfect form to express and share somthing with you all. I've read the book 'Attitude is Everything' by Jeff Keller (as I want to have a miraculous evening , thinking about morning of THE day next to me) and was eagerly waiting to share all that important stuff which no one should miss ! Its the evening of the year 2021 and we are awaiting to see A NEW SELF. So guys I'm trying to help your to blossom your beggining. Have a glance on below quotes and then I'm sure you'll definitly invest your penny to get the results.

                   I just tried to sum-up the lines , quotes and paras which touched my soul and made my brain to right those on the paper of my new year. Author have collected and added very relatablly many quotes by other respected dignities too.

                   Have a deep breath and patiently absorb what you read in the next few minutes and don't forget to note it down on the new paper of your life.

___________________________________________________


Introduction : "The night that changed my Life"


"The greatest discovery of my generation is that human beings can alter their lives by altering their attitudes of mind."


"There's got to be more to my life than this , there is got to be more than this misery and happiness."


"You are not what you think you are. But what you think you are."


"Never underestimate the power to change yourself."


"A positive attitude is persons passport to a better tomorrow."


"Proof positive that , indeed , attitude is everything." 


"Think , act and talk with enthusiasm and you will attract positive results."


Part : 01 "Success begins in the mind."


"Success is a state of mind. If you want success , start thinking of yourself as a success."


"Your attitude is your window to the world."


"Better keep yourself clean and bright ; you are the window through which you must see the world."


"Attitudes are a secret power working 24 hrs a day , for good or bad."


"Everyone starts with a clean mental Window." 


"You can't always control circumstances. But you can control your own thoughts."


"You control your attitude."


"Read "Man's search for meaning'' - Dr.Viktor Frankl." 


"There is nothing good or bad but thinking makes it so."


"A blog person is not a person in a certain set of circumstances , but rather a person with a certain set of attitudes."


"Whether you think you can or think you can't , you are right."


"We become what we think about."


"Our thoughts determine our action."


"What the mind can conceive and believe , the mind can achieve."


"Nurture your mind with great thoughts."


"DOMINANT thought : you can't expect positive results when you spend 10 second a day thinking positively and the remaining 16 waking hrs dwelling on negative outcomes."


"A little positive thinking doesn't produce positive results."


"A little bit just doesn't get the job done."


"You can achieve your goal when you believe in yourself and keep your thoughts focused on the positive."


"If your thoughts don't change , your results won't change."


"They can because they think they can."


"What we sincerely believe regarding ourselves is true for us."


"Your mind hears every word you speak , and like a magnet you will ultimately attract the events and circumstances that correspond to your dominant belief ; so make sure to use positive words about yourself and your goals."


"Repeatation is the key."


"Nobody succeeds beyond his or her wildest expectations unless he or she begins with some wild expectations."


"Negative thinking yields negative results and positive thinking produces positive results."


"Picture your way to success."


"You must first clearly see a thing in your mind before you can do it."


"You have control over the pictures that occupy your mind."


"Vision is the art of seeing things invisible to others."


"The key is to spend several minutes each day running these new movies in your mind."


"If you can dream it , you can do it."


"What this power is I can not say ; all I know is that it exists and it becomes available only when a man is in that state of mind in which he knows exactly what he wants and is fully determined not to quit until he finds it."


"Read a book "The ultimate secret to getting absolutely everything you want" by Mike Hernacki"


"Willingness to do whatever it takes."


"Until one is committed there is hesitancy , the chance to draw back , always ineffectiveness. Concerning all acts of initiative and creation there is one elementary truth , the ignorance of which kills countless ideas and splendid plans ; that the moment one definitely commits oneself , then providence moves , too."


"All sorts of things occur to help one that would otherwise never have occurred. A whole stream of events issues from the decision , raising in once favor all manner of unforeseen incidents and meetings and material assistance , which no man could have dreamt would have come his way."


"Effort only fully releases it's rewards after a person to quit."


"With ordinary talent and extra ordinary perseverance , all things are attainable."


"Magic of commitment exists."


"You become a champion by fighting a one more round. When things are tough , you fight one more round."


"One person with commitment is worth more than 100 people who have only an interest."


"The rewards for those who persevere for exceed the pain that must precede the victory."


"Talk about keeping a good attitude in the face of rejection."


"Select a goal you have a burning desire to achieve."


"Turn your problem into opportunity."


"Every adversity carries with it the seed of an equivalent or greater benefit."


"The road to success often travels through adversity."



"No pressure , no diamonds."



"The things which hurt , instruct."



"Success gold cards - attitude , leadership , persistence , courage."



"When one door shuts , there is always a better one waiting to be opened."



"It is rough road that leads to the heights of greatness."



"I now realize that all the miseries i endured were really blessings in disguise."



"When someone asks me why I changed careers , i reply , without hesitation , 'LOTS OF PAIN' - physically , emotionally and spiritually."



"Adversity brings out our hidden potential."



"Adversity serves us :
Adversity gives us perspective.
Adversity teaches us to be grateful.
Adversity encourages us to make changes and take actions.
Adversity teaches us valuable lessons.
Adversity opens a new door.
Adversity builds confidence and self esteem."



"When you have no hot water , you suddenly value hot water. Not until you are sick you do cherish good health."



"Don't immediately judge your situation as a tragedy and dwell on how bad off you are."



"You can actually see better than you did before."



Part : 02 "Watch Your Words."



"Repeat anything often enough and it will start to become you."



"The words you consistently select will shape your destiny."



"Your words have incredible power."



"Think of this process as a row of dominos that looks like this : THOUGHTS > WORDS > BELIEFS > ACTIONS > RESULTS."



"Words are , of course , the most powerful drug used by mankind."



"Don't underestimate the role of your words in this process."



"People who feed themselves a steady diet of negative words are destined to have negative attitude."



"In words are seen the state of mind , character and disposition of the speaker."



"Never discuss your goals with negative people."



"I'll only discuss my plans with people who are qualified to render an intelligent opinion on the subject."



"The people who always talk about a lack of money generally don't accumulate much of it."



"Read the book "Awaken the Giant Within" by Anthony Robbins"



"Chose words that will point you in the direction of your goals."



"Use the words that are consistent with the path your truly wish to be on."



"Your day goes the way the corners of your mouth turn."



"A smile is an inexpensive way to improve your looks."



"Everybody lights up a room - some when they walk into the room and some when they walk out of the room ; you want to be one who lights up a room when you walk in."



"We get what we expect in life."



"Say you are well , or all is well with you, and god shall hear your words and make them come true."



"A cloudy day is no match for a sunny disposition."



"Troubles , like babies , grow larger by nursing."



"Self pity is an acid which eats holes in happiness."



"The secrete of happiness is to count your blessings while others are adding up their troubles."



"If you have all the fresh water your want to drink and all the food you want to eat , you ought never complaining about anything."



"Reflect upon your present blessings , of which every man has plenty ; not on your past misfortunes , of which all men have some."



"If you are a!l wrapped up in yourself , you are overdressed."



Part : 03 "Heaven Helps Those Who Act."



"Nothing happens by itself. It all will come to your way once you understand that you have to make it come your way , by your own exertions."



"A mirror reflects a man's face , but what he is really like is shown by the kind of friends he chooses."



"We become part of what we are around."



"Whatever you hear over and over will be at the forefront of your consciousness."



"Your friends will stretch your vision or choke your dreams."



"Those who occupy your time have a significant impact on your most priceless possession - your mind."



"Are the things around you helping you toward success - or are they holding you back ?"



"When it comes to productivity in the workplace , attitude is everything."



"Good friends are good for your health."



"Confront your fears."



"Do the thing you fear and the death of fear is certain."



"If you want to be successful , you must be willing to be uncomfortable."



"Show me a successful person and I'll show you someone who confronts his or her fears and takes action."



"Nothing in life is to be feared. It is only to be understood."



"He who loses wealth loses much , he who loses a friend" loses more , but he who loses courage loses all.



"Consider yourself an immediate winner wen you take the "step and do the thing you fear."



"Developing any skill takes time."



"The only way to escape from the prison of fear is action."



"Running away from your fears is a losing strategy."



"So , stretch yourself. Confront your fears and be willing to expand your comfort zone."



"Failure is only the opportunity to more intelligently begin again."



"Success is going from failure to failure without loss of enthusiasm."



"The greatest mistake a person can make is to be afraid of making one."



"Success seems to be largely a matter of hanging on after others have let go."



"Would you like me to give you a formula for success ? It's quite simple. Double your failure."



"You may be disappointed if you fail , but you are doomed if you don't try."



"If you make it your business to learn from every defeat and focused on the end results you wish to attain , failure will eventually lead you to success."



"You can get everything in life you want if you'll just help enough other people get what they want."



"Go through : "Handbook To A Happier Life" "This is Your Life , Not A Dress Rehearsal" by 'Jim Donovan."



"If you are positive and enthusiastic , people will want to spend time with you."



" 'Networking' = Development of Relationships with people for mutual benefit."



"Project a winning attitude."



"Participate actively in groups and organizations."



"Serve others in your network."



"Getters don't get givers get."



"Give and it shall be given unto you."



"If you refer someone , make sure that the person mentions your name as the source of the referral."



"Be selective. Don't refer every person you meet."



''Be a good listener."



''In your conversations , focus on drawing other people out. Let the talk about their careers and interests."



"Call people from time to time just because you care."



"You can succeed best and quickest by helping others to succeed."



"Take advantage of everyday opportunities to meet people."



"Treat every person as important - not just the 'influential' once."



"At meetings and seminars make it a point to meet different
people."



"Be willing to go beyond your comfort zone."



"Ask for what you want."



"Send a prompt note after meeting someone for the first time."



"Acknowledge powerful presentations of articles."



"When you receive a referral or helpful written materials , ALWAYS send a thank you note or call to express your appreciation."



"Send congratulatory cards and letters."


Conclusion : "Change your attitude and you change your life"



"To change your circumstances , first start thinking differently."



"When your change your attitude , you change your life."



"Act as it it were impossible to fail."


"The longer I live , the more I realize the impact of attitude on life. Attitude , to me ,is ore important than facts. It's is more important than the past , than education , than money , than circumstances , than failures , than success , than what other people think or say or do. It is more important than appearance , giftedness of skill. It will make or break a company , a church , a home.

The remarkable thing is we have a choice every day regarding the attitude we will embrace for that day. We can not change our past we can not change the fact that people will act in a certain way. We can not change the inevitable. The only thing we can do is play on string we have and that is our attitude.

I'm convinced that life is 10 percent what happens to me and 90 percent how I react to it. And so it is with you , we are in charge of our Attitudes."


"PLAY ON THE ONE STRING YOU HAVE" - YOUR ATTITUDE.


(To be continued)


Name of the Book : 'ATTITUDE IS EVERYTHING'

Author : JEFF KELLER - Founder & President of Attitude is Everything , Inc. He is a native New Yorker. 

Other book by the same author : 'The Winning Attitude' ( which contains 54 of his most popular essays )

Published in India : 2015 by 

Publisher : Collins ( an imprint of HarperCollins publisher )

Number of pages : 128 ( Three main Parts with , Twelve lessons , One introduction and One conclusion )

Thursday, June 24, 2021

अमृतवेल



मोगरा फुलला... मोगरा फुलला...


नंदा खूप आत रुतून बसलेय. मनाच्या आत आत डोकावून पाहिलं की दासबाबूंचा आवाज येतो , प्रीतीचा अर्थ सांगणारा तो थोर माणूस मनाला फार फार भावतो. दादा नंदेची पत्रं , तिने लिहिलेले कागदाचे कपटे वाचत , ते फार आवेगाने काळजात आपली जागा तयार करतात. माई आणि मिलिंद नंदाच्या खूप जवळचे आणि हक्काचे , तिला अंततः समजून , उमजून घेणारे.

नंदाचं मृत शेखरमध्ये अडकून राहणं आणि स्वतःला बंदिस्त करून घेणं समोर येतं तेव्हा , कित्येक अडकलेली पाखरं पंख फडफडत पिंजऱ्यात आयुष्य काढत असतील याची प्रचिती येते. आयुष्याला स्वतःच्या क्रूर दोरांमध्ये अडकवून घेऊन साध्य तरी काय होतं ? इतक्या मोठ्या , अनुभवी , थोर माणसांच्या आयुष्याचं सार वाचूनही आपल्या आयुष्यात निरर्थक हेतू ठेवून जगणं म्हणजे एकप्रकारे आत्महत्याच नाही का !

काही काळाने नंदा वसुकडे जाते. काहीतरी बदल म्हणून जाते. दादांनी सांगितलेलं मनात साठवून जाते. स्वतःचं दुःख बाजूला सारायला जाते. मधुरेशी तेव्हा तिची नाळ जुळते. बापू आणि सावित्रीआईसारख्या निरामय माणसांना भेटून नंदा कृतार्थ होते.

हे इथं शब्दांत मांडतानाही धडधड होतेय. कंठ दाटून येेेतोय. नंदा भेटते देवदत्त नावाच्या महाशयांना. पुस्तकांना जीवनाची बाग आणि त्याच पुस्तकांना स्मशान संबोधनारा हा देवदत्त 'चंचल' या त्याच्या हरिणीशी बोलतो 'माझे दोनच मित्र एक तू आणि दुसरा मृत्यू' तेव्हा कोणीही अश्वत्थामी हृदय असणारी व्यक्ती त्याच्यासाठी मेणबत्तीचं मेन गळून जावं तशी गळून जाते. त्याच्या विचित्र असण्याला , त्याच्या अहंकाराला , गूढ तटस्थपणाला , त्याच्या काटेरी असण्याला , विजेसारख्या अस्थिरतेला , त्याच्या साऱ्या साऱ्या रुपांना क्षणात स्वीकारून भाळून जाते. विसं तुम्ही देवदत्त फार फार खोल कोरून बसेल असा निर्माण केलात. तो दुःखी आणि आयुष्याला विटलेला , आत्महत्येच्या कल्पनेने ग्रासलेला असला तरीही त्याच्यावर भरभरून प्रेम करावेसे वाटते.

नंदा जशी त्याच्या प्रेमात न पडता , त्याच्यावर प्रेम करते तसं प्रेम करण्याची ताकद प्रत्येक माणसात आहे ; गरजेचं इतकंच आहे की , वासनेला प्रेम समजून त्या दोहोंचं मिश्रण होऊ देऊ नये. देवदत्त आणि नंदा यांच्यातली प्रीतीची चाहूल वाचकाला ज्या क्षणी जाणवते त्या क्षणी प्रेमाकडे पाहण्याची त्याची वृत्ती पुरी बदलून जाते. नंदा कधी भेटली तर तिला एवढेच विचारेन "देवदत्ताला आत्महत्येच्या सततच्या विचारांमधून तू दूर केलेस खरे पण ; त्याला सहवासाने दूर का लोटतेस तू ? भाऊबीजेला बोलावून ओवळणीत त्याचे अश्रूच का हवेत तुला ? 'सुख माणसांना दुखतं' तसं काही झालं का तुला ?"

एखाद्या कल्पित कथेने श्वास गहिवरून यावेत असा क्षण फार दुर्मिळ असतो ; मात्र इथे तो येतो. तेव्हा शब्द स्तब्ध होतात आणि फक्त डोळे बोलतात , मन भडभडून वाहत असतं ; अबोल राहून. देवदत्तासाठी रडावंस वाटतं. वसू देवदत्ताला भेटण्याअगोदर ; नंदेला खेचून त्याच्याकडे आणावं असं वाटतं आणि त्या लायब्ररीमध्ये ठेवलेल्या दोन प्रतिमांमध्ये मन हरवून जातं... हॅमिंग्वे आणि विवेकानंद...!!

वि. सं. खांडेकर यांची १९६७ साली प्रकाशित झालेली 'अमृतवेल' कादंबरी अवघ्या १६० पानांची. आवर्जून वाचा. वाचून दुःख झालं तर त्या दुःखाने अंतर्मुख व्हाल आणि आत्मपरीक्षण कराल अशी अपेक्षा. आनंदाने सुखी झालात तर , आठवणीने तो आनंद वाटा ; आनंद वाटण्याएवढा आनंद आणखी कशात नाही !

Saturday, June 19, 2021

सुखाचा शोध


      

                                १९३९ मध्ये प्रकाशित झालेली , मराठी साहित्यातील पहिले 'ज्ञानपीठ' मानकरी , 'ययाती'कार विष्णू सखाराम खांडेकर यांची 'सुखाचा शोध' ही कादंबरी म्हणजे मराठी साहित्यातील मानाचा तुरा आहे. विसं म्हणजे सर्वकाळ प्रेम करावं अशी जीवनदायी लेखनसमृद्धी ! मनुष्यजीवनातील त्रिवेणी संगम म्हणजे 'सुखाचा शोध' याचं कथानक. 

                               या कथेत 'आनंद' त्याचा मोठा भाऊ 'आप्पा' , आप्पाची मुलं 'मीरा' आणि 'बाळ' , 'आई' , आनंदची बायको 'माणिक' , माणिकचा मित्र 'धनंजय' , आनंदची भक्त 'उषा' आणि एक नटी 'चंचला' या व्यक्तिरेखा आहेत.
                               आप्पा हा माणूस म्हणजे 'आजारी पत्नीस , तुझ्याहूनही माझी मातृभूमी आजारी आहे' असं रोखठोक सांगणारा मात्र ; कीर्तीच्या वाऱ्यात नाती आणि घर विसरलेला मनुष्य. आप्पाची दोन मुलं आईविना ; त्यामुळं मीरा आणि बाळ यांना आनंदाचेच अधिक लाड असत. आप्पाचा सर्वाधिक वेळ हा सभा , संमेलनं , व्याख्यानं यातच. आप्पा म्हणजे प्रसिद्धीची चादर पांघरलेला समाजसेवक. आई देवाघरी गेल्यामुळे व्याख्यानं खोळंबलीत म्हणून त्याच आईवर खापर फोडणारा अवलिया.
                               भय्या हा आनंदाच्या वारलेल्या बहिणीचा मुलगा ज्याचा सांभाळ आनंदाच्या आईने उचलला होता. त्याला भारी सिनेमांचा नाद. चंचला नावाची नटी त्याला भुरळ पाडी. तो नेहमी नट्या आणि सिनेमांमध्येच रमलेला असे.
                               आई म्हणजे थोडक्यात आनंद मानून समाधानानं जगणारी धीट बाई. मुलगी गेल्यावर जावयाशी भांडून नातवाला आपल्याकडे तिनेच आणलं होतं. आनंदावर तिचा फार फार जीव. आनंदही तिच्यासाठी , तिला हवे ते करायला तयार असे. मात्र आनंदाचे लग्न उरकून होते न् होते ; आई देवाघरी जाते.
                               उषा म्हणजे भावबंधांच्या दोन्ही टोकांकडून वंचित राहिलेली निर्विकार मूर्ती. स्वतःच्या आयुष्याच्या भोगांचा अतिरेक झाल्यावर त्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी बोटीवरून जीव देताना आनंद तिला वाचवतो आणि पुढे ती तिच्या देवाला म्हणजेच आनंदला वाचवते. उषा फार कमी बोलूनही , फार खोलवर मृदुमयरित्या वाचकाच्या मनावर रुतून बसते. अखेरीस माणिकच्याही !
                               माणिक ही पाण्याखाली दबलेल्या बोटीच्या अर्ध्या भागासारखी ! ना तिला कधी वर येता आले , ना तिला कधी पूर्ण डुंबता आले. किनारा येईतोवर ती दबून राहिली आणि साऱ्या सुखाला मुकली. धनंजयच्या न येणाऱ्या सादेला हाकारत आनंदसोबतच्या संसारसुखाला डावलून अधुरी जगली. खरंतर माणिक गृहितकांच्या खेळात अडकून गेली. मनाप्रमाणे एकही गोष्ट होईना तेव्हा उषेच्या निस्वार्थ 'असण्या'ने खजील होऊन स्वतःच्या सुखाला अखेरीस माणिकने स्वीकारले.
                               चंचला ही वेश्येच्या आवरणातून एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या दुनियेत रमली खरी पण ; अंतापर्यंत सुखाच्या फक्त शोधातच राहिली. स्वतःच्या सौंदर्यावर स्वतःच भाळून आयुष्याला जुगार समजणारी चंचला नेहमी असमाधानीच राहते तेव्हा तिच्यावर दया येते. ना तिला माणिकची बुद्धी होती ना तिच्यात उषेचा निर्विकार अंश. ती वाहत राहिली आणि दुसऱ्याला उध्वस्त करण्याच्या प्रयत्नात स्वतः उध्वस्त होत गेली.
                               आनंद हा व्यक्तिगत सुख बाजूला ठेवून कौटुंबिक आणि सामाजिक सुखाचा विचार अधिक जवळून करणारा अळवावरचा थेंब म्हणावा लागेल. त्याची स्थिरता उषेमध्ये होती हे कळायला आनंदाला फार फार अस्थिरतेचा प्रवास करावा लागला. दिव्यातलं तेल संपलं की , दिवा जळणं थांबवतो तसंच काहीसं आनंदचं झालं ! माणिक , चंचला की उषा यात त्याची फरफट झाली. सुखाच्या शोधात कैक दुःखं त्यानं पचवली. तरी त्यानं सुख पेरणं राहू दिलं नाही ; तो सुख पेरत गेला आणि उषेच्या असण्यात ते उगवत गेलं. उषा प्रत्येकवेळी खिंडीत कोसळणाऱ्या आनंदला वाचवणारी शिडी होती. त्यांच्यातले दहाचे ठोके भक्तिरूपी प्रेमाला दृढ करत राहतात हेही तेवढेच खरे !
                              कधी कधी शब्दांचं वाहणं पुरं आटून जातं , तसं ही कादंबरी वाचल्यावर होऊन जातं. त्यातला सारा सार पिऊन तो प्रतिबिंबित करणं भारी जड जातं. म्हणून ; या कादंबरीतील भावलेले शब्दसंघ , कुठेतरी कोरून ठेवावीत अशी वाक्यं , इथे मांडण्याचा प्रयत्न करतेय ; आपल्यालाही ते जीवनमंत्र मोहून टाकतील यात शंकाच नाही.

"पानांआडून डोकावणारी कळी किती मनोहर दिसते , विरळ धुक्यातून चंद्रकोर किती मोहक वाटते , लाजेने तरुणीही आकर्षक होत असावी."

"नंदादीपापासून , विजेच्या दिव्यापर्यंत घरात दिवे असतात पण ; खिडकीतून हळूच आत येणाऱ्या चांदण्याचा आनंद या दिव्यांच्या प्रकाशात नसतो."

"उषा हे माझ्या दृष्टीने देवाला वाहिलेलं फुल होतं ; ज्याला हात लावायचा नाही , ज्याचा वास घ्यायचा नाही , अशा फुलाच्या दर्शनाने कोण सुखावील ?"

"पुरुषाचा मोठेपणा घराबाहेर असतो , घरात तो लहानच असतो."

"प्रेम हे मद्य आहे. प्रेम हे मृगजळ आहे."

"तरुणी हे गुलाबी कोडं आहे."

"मनातल्या मनात प्रत्येकजण कवी असतो ; कोणी कविता करतो , कोणी करत नाही एवढाच काय तो फरक !"

"आयुष्य हा जुगार आहे."

"ज्याचा आग्रह करावा अशी एकच गोष्ट आहे या जगात 'सत्य' ."

"केवळ स्वतःसाठी जगणं ही आत्महत्या आहे."

"सवडीनं येणारी माणसं परत कधीच येत नाहीत."

"काही माणसं अभिमानावर जगतात , पैशावर नाही."

"मनुष्याने बेभान होऊन जखम करणं निराळं आणि आपण केलेल्या जखमेतून वाहणारं रक्त शांतपणे पाहणं निराळं."

"सौंदर्य कधी कधी भयंकर असतं."

"आयुष्य हा खेळ नाही , लढाई आहे."

"गुलामाला हक्क नसतात हेच खरं."

"त्यागानं देवता प्रसन्न होतात , भुतं नाहीत."

"जिवंत मन मर्यादा जाणत नाही."

"काही सावज पकडता येत नाहीत."

"जीवन दुःखमय आहे तरी , मनुष्य किती धडपड करतो ; त्याचं ते धडपडत जगणं काजव्याच्या लुकलूकण्यासारखं असतं."

"स्त्रीचं सारं पावित्र्य तिच्या पदरात असतं."

"जीवाला जीव द्यायचा असतो , मातीला जीव नाही."

"समाजसेवा हा कित्येकांना कीर्तीचा राजमार्ग वाटतो.
शेंदूर लावलेला दगड पाहिला की , लोकांचे हात आपोआप जोडले जातात.
त्यागाशिवाय खरी समाजसेवा जगात शक्य नाही."

"दुसऱ्याचं दुःख हलकं करण्यात केवढा आनंद असतो."

"सेवा जग फुलविते आणि प्रीती मन फुलवते."

"जगात तात्काळ मिळणारी खूप विषं असतात."

"प्रिय माणसापासून आनंदाने कुणी दूर जाईल का !"

"आयुष्य हे गणिताच पुस्तक नाही , ती एक विचित्र कादंबरी आहे."

"स्त्रीचा शृंगार पुरुषांच्या सुखाकरिता असतो , अंगावरले दागिने या तिच्या गुलामगिरीच्या शृंखला असतात."

"माणसाचं आयुष्यं थोडंतरी कादंबरी सारखं असावं."

"पेरल्याशिवाय उगत नाही हा नियम सुखलाही लागू आहे."

"दुःख हेच मनुष्याला लवकर अंतर्मुख करत."

" 'त्याग' हा प्रीतिमंदिराचा 'कळस' आहे आणि 'भोग' हा 'पाया' आहे."

"समाजसेवा हे प्रीतीचेच विशाल रूप आहे."

"प्रेम हाच या जगातला परमेश्वर आहे."

"खालच्या वर्गाची सेवा करायची तर , आपल्या वर्गाचा अभिमान सोडावा लागतो."

"सुख दोनच माणसांच्या जगात असतं."

( ऋण - मिलिंद फाटक )
'विसं' सदैव नमन _/\_

पुस्तकाचे नाव - ''सुखाचा शोध''
लेखक - 'विष्णू सखाराम खांडेकर'
पृष्ठे - ११२
मूळ प्रकाशन वर्ष - १९३९
सद्य प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस
स्टोरीटेल प्रदर्शन - २०१९ मिलिंद फाटक यांसोबत.
स्टोरीटेल अभिवाचन कालावधी - ०३ तास १० मि.

Friday, June 18, 2021

धोंडी


                                पुन्हा गोनीदां ! 'पडघवली' , 'जैत रे जैत' नंतर गोनीदांची लाघवी बोली न्याहाळत राहावी अशीच वाटते. धोंडीबद्दल सुरुवातीपासून एक उत्सुकता होती. प्रवाहासोबत वाहायचं नाकारणाऱ्याला धोंडीला प्रत्येकाने भेटलं पाहिजे असं वाटतं. १७ जून २०२१ रोजी 'पवनाकाठचा धोंडी' हे 'गो. नी. दांडेकर' यांचं पुस्तक वाचलं. मराठी साहित्यातील आणखी एका अप्रतिम कलाकृतीचा आस्वाद घेतला. 'धोंडी' हे या कथेतील एक पात्र. जरा पत्र वगैरे लिहून हवालदारांचा मान पान करू म्हटलं !!


डिअर धोंडी ,

                                प्रत्येक वाचकाला हेवा वाटावा असा तू 'धोंडी'. पवन मावळात तुला इतका मानपान का आहे हे कळायला प्रत्येकाला धोंडी हवालदार म्हणून एक दिवस तरी जगता आलं पाहिजे. धोंडी , दुसऱ्याचं रान पडू नये म्हणून इरजीक बेतणारा तू जेव्हा स्वतःच्या रानात स्वाभिमानापोटी स्वतः बैलासारखा खपतोस आणि त्याच काळ्या आईच्या कुशीत श्वास सोडतोस तेव्हा खरंच तुझा हेवा वाटतो. तुंगी गडाचा मनापासुन , निस्वार्थीपणे सांभाळ करतोस ; मोबदला एवढाच की लोकांनी तुला 'हवालदार' म्हणावं , तुझी विचारपूस करावी , गड पाहायला तुझी परवानगी घ्यावी ! सरकारकडून तुला मिळतो त्याला नजराणा समजून , इतक्या वर्षांनंतरही अगदी गर्वाने शिवाजी राजाच्या ऋणात जीवन जगणारा तू पवना नदीतला मोतीच जणू !

                                कोंडीला लेकरासारखं पोटाजवळ घेतलंस , सारजेनं तर कोंडीसाठी काय नाही केलं ! पण ; तो तुझ्यापेक्षा फार वेगळा. तुझ्यासारखं तत्वांसाठी रक्त जाळायला त्याला काय , कुणालाच जमायचं नाही. कोंडी पुढल्या जगात राहणारा माणूस. स्वतःचा दुधधंदा करून त्याने पैसे मिळवले खरे पण ; गोरस विकणं हे पाप आहे असं जेव्हा तू सांगतोस तेव्हा तुझी जनावरांवरची माया कळते. सारजेवर तुझा कितीतरी जीव ; तिची शेवटची घटका पाहिलीस तू पण , कोंडीचा पाण्याचा एक पैसा घेतला नाहीस. म्हणूनच काय ते 'कोंडी ढमाले' म्हटलं की लोकं इब्रतीनं वागतात.

                               सरू सारखी पोर घरात आणून तिला तू जी माया , आपलेपणा आणि जबाबदारी दिलीस त्यावरून कळतं घराचं वात्सल्य चिरंतर राहावं म्हणून इतकी वर्षं किती राब-राब राबलास.

                              धोंडी , तुझ्यातला स्वाभिमान , तुझ्यातला ठामपणा , तुझ्यातलं प्रेम , तुझी मेहनत , तुझ्या मनाचा मोठेपणा , तुझं तत्वनिष्ठ जगणं सारं-सारं प्रत्येक वाचकाला तुझ्यावर प्रेम करायला भाग पाडतं. तू प्रवाहासोबत वाहत नाहीस खरा पण ; तुझ्या 'असण्या'वर तटस्थपणे ठाम राहतोस हे भारी थोरपण आहे तुझं !

( ऋण : वीना देव , विजय देव , मधुरा देव , रुचिर कुलकर्णी )
सदैव नमन 'गोनीदां' _/\_

Tuesday, June 15, 2021

बनगरवाडी


                              'व्यंकटेश माडगूळकर' यांचे नाव मराठी साहित्यिक , रसिक आणि वाचक मोठ्या आदराने घेतात. माडगूळकरांची शैलीच एवढी न्यारी. वाचणाऱ्याने भान हरवून माडगूळकर म्हणतात तिथे गेलंच पाहिजे अशी त्यांची ठेवण. आणि मग शेवटचं पान पलटलं की , आपण जागे होतो आणि राहून राहून माडगूळकरांच्या प्रेमात पडतो. १४ जून २०२१ रोजी 'व्यंकटेश माडगूळकर' यांची 'बनगरवाडी' ही कादंबरी वाचली. १९५५ साली लिहिलेल्या या कादंबरीवर आधारित चित्रपटही १९९५ ला प्रदर्शित झाला. ही कथा एक शाळा मास्तर आणि एक वाडी यांच्यातील कथानक आहे.

                              राजाराम नावाचा तरुण , उमदा शिक्षक बनगरवाडीला रुजू होतो. हळूहळू तिथे रमून जातो. मुलांना शिकवायला गेलेला हा शिक्षक माणूस गावचा आधार बनतो. गावातली पोरं सोरं , म्हातारी माणसं सगळी सगळी मास्तरच्या भोवतीने ! मास्तरनी हा अधिकार आणि मान गावातल्या माणसांच्या नडीला येऊन मिळवलेला असतो. कालांतराने मास्तर गावचा माणूस होऊन जातो. अडल्या गावकऱ्याच्या कामाला येणं , गावकऱ्यांंची मर्जी सांभाळणं , कारभारीच्या मदतीने सगळे निर्णय घेणं , आयबू सारख्या एकट्या मुलाला घरातल्या माणसाप्रमाणे मास्तर वागवत , रामाचे पैसे मोडून आणणे , आनंदा रामोशी म्हणजे वेगळीच कमाल आणि शेवटी तालीम बांधवून घेणे अशा कैक आठवणी , सुसंवाद , आपुलकी बनगरवाडी सोबत झाली होती मात्र ; शेवट फारच उदास करून जातो. दुष्काळात बनगरवाडी पोरकी होते. कुणी कुणी गावात उरत नाही. काकोबा एकटा असतो त्याला रामराम करून शेवटी मास्तरही तालुक्याच्या गावात बदली होऊन जातात.

                             हा एकूण प्रवास इतर कुणी सांगण्यापेक्षा किंवा लिहिण्यापेक्षा माडगूळकरांच्या लेखणीतून वाचणं म्हणजे एक सुखद अनुभव ! कारभारी कसा तत्वाला धरून आहे , त्याची आंजी कशी आहे , रामा बनगर माणूस म्हणून कसा आहे , नडीला चोरी करून नंतर येऊन स्वतःच खुलासा करणारा आनंदा कसा आहे , आयबू , शेकू , शेकूची बायको , जगन्या , रामोशी वाडी , वांगीची लोकं , दादू बालट्या , गावाबाहेरचा बाळा आणि मेंढक्यांची लेकरं म्हणजे 'शेरडं' त्यांचं रोजचं जगणं , वाडीतला रोजचा प्रत्येक प्रहर आणि वाडीतल्या रीती भाती जसं की , एकाचवेळी सगळ्या गावची सगळी लग्नं उरकण्यामागचं कारण असो किंवा देवीची यात्रा असो की , गावातल्या गावात न्याय होत नसेल तर अख्ख्या धनगरांच्या वडीलधाऱ्यांना बोलावणं घालणं असो अशा कित्येक गोष्टी वाचकाला बनगरवाडीकर बनवून जातात.

                             मनाला खूप भावते ती माडगुळकरांनी वर्णिलेली बनगरवाडी ! म्हणजे अगदी गुण्यागोविंदाने राहणारं गाव जेव्हा कोरडं पडलेलं समोर दिसतं तेव्हा जाणवतं बनगरवाडी मराठी साहित्यातील मानाची , श्रेष्ठ कादंबरी का आहे ते ! म्हणून वेळ काढून बनगरवाडीला एकदा तरी जाऊन आलंच पाहिजे.

( ऋण : चंद्रकांत कुलकर्णी )
सदैव नमन 'माडगूळकर' _/\_

Monday, June 14, 2021

नाग्या




'जैत रे जैत' हा स्मिता पाटील , मोहन आगाशे , निळू फुले , सुलभा देशपांडे यांचा १९७७ साली प्रदर्शित झालेला अनोखा चित्रपट. त्यातील 'आम्ही ठाकर ठाकर' , 'जांभूळ पिकल्या झाडाखाली' , 'नभ उतरू आलं' , 'लिंगोबाचा डोंगुर' , इ. भन्नाट गाणी आजही मराठी रसिकांना वेड लावतात. हा चित्रपट 'गो. नी. दांडेकर' यांच्या 'जैत रे जैत' या कादंबरीतील कथेचं रूप आहे. मंडळी १२ जून २०२१ रोजी माझं ठाकरवाडीला जाणं झालं. नाग्या हा या कथानकातील नायक आणि चिंधी ही त्याची सोबतीन. ठाकरवाडी पाहून आल्यावर कधी एकदा नाग्याला पत्र लिहिन असं झालं होतं ; म्हणून...

डिअर नाग्या ,

कमालीचा ढोलीया आहेस यार नाग्या तू ! उगाच का चिंधी सगळं सोडून तुझ्याकडे आली !! आयशीच्या पोटात असल्यापासून तुझं जणू प्रशिक्षण चालू होतं ढोलीया बनण्याचं. बा सोबत रानात जाऊन रोज एकेक विद्या जणू गोळा करत होतास. तसा तू भगत पण लिंगोबाशी तुझा वेगळाच मैतर गड्या !

नाग्या , तुला माहितीये का अख्या ठाकरवाडीच्या इतिहासात कुणी जे केलं नाही ते तू केलंस ; कुणामुळे माहितीये का , तुझ्या बा मुळे ! बा नं तुला पुण्यवंत होण्याचा मंत्र दिला , तू तो उगाळून प्यायलास म्हणून हे अद्भूत शक्य झालं. चिंधीच्या तुझ्याविषयीच्या प्रेमामुळे तिनं शेवटी तुला जखमाळलेल्या अवस्थेत 'राणी माशी उडाली , तुझा जैत झाला नाग्या' सांगितलं , तेव्हा नकळत सोबतीन असण्याचा अर्थ कळून जातो.

तू निश्चय केलास , तुला राणी माशी डंकली म्हणून तू राणी माशीला डंकलास ; नाहीतर जो नाग्या राणी माशी कधी दिसलीच तर तिला डोकं टेकून पाया पडायचा तो का बरं त्याच राणी माशीच्या जीवावर उठेल. पण नाग्या प्रचंड निश्चयी आहेस रे तू. हा यावरून आठवलं , झाडावर चढण्याआधी तू जमिनीवर डोकं टेकून म्हणायचास , '' झाड देवा , हिरव्या ढाप्याला धक्का सुद्धा लावणार नाही , वाळलेली काडी बघून बघून काढून घेतो , काय चुकलंच तर माफ कर ''. लिंगोबाच्या डोंगरावर चढतानाही तेच , कितीवेळा माफी मागितलीस. तुझ्या बा ला साप चावला आणि बा देवाघरी गेला तेेव्हाही तू सापाला जाब विचारलास , ''जेव्हा जेव्हा रानात तू दिसलास तेव्हा तुझ्या पाया पडलो , तुझ्या वाटेतून बाजूला झालो ; माझं काय चुकलं म्हणून आज माझ्या बा ला तू डकलास साप देवा ? '' ( मुक्या जीवाला मारणं खूप दूर , दुखावनं सुद्धा तुझ्याच्याने शक्य नाही बघ )  निसर्गासोबतचं तुझं हे नातं अचंबित करणारं आहे रे.

डोळा फुटलेला , रूप कोलमडलेलं असलं तरी जीव ओवाळून टाकणारी चिंधी , तिला सोबत घेऊन पुण्यवंत बनायला निघालेला तू. भल्या मोठ्या बैलावर बसलेला म्हादेव बघून तुला भगवंताचं दर्शन घ्यायचं होत खरं पण बा च्या शिकवणीला अर्थही लावायचा होता. कमालीचा ढोलीया तू , ठाकरांचा लाडका भगतही तू , चिंधी सारखी सोबतीन मिळणारा नशीबवानही तूच आणि लिंगोबानं कुशीत घ्यावं , सतत तुझ्या जवळ राहावं इतका पुण्यवंतही तूच !

निसर्गाला देव म्हणणारा तू , तुझ्यासारखं निसर्गाला जपणं आम्हाला जमेल का रे ? हिरवीगार झाडं तोडताना आम्ही माफी कधी मागणार ? डोंगर खोदताना आम्हाला त्यात देव कधी दिसणार ? नाग्या लिंगोबाच्या एका बाजूला झाडं , डोंगर , लहान-सहान जीव , सर्प-नाग यांची माफी मागणारी , त्यांना दुखावू नये म्हणून काळजी घेणारी तुझी ठाकरवाडी होती आणि त्याच लिंगोबाच्या दुसऱ्या बाजूला कोरडी , भकास आणि बेफिकीर वाढत चाललेली एक दुनिया आहे ; नाग्या , ठाकरवाडीची ही बुद्धी आम्हाला कधी प्राप्त होईल का रे ?

( ऋण : वीना देव , विजय देव )
सदैव नमन 'गोनीदां' _/\_

Friday, June 11, 2021

अंबी



१० जून २०२१ रोजी 'गो.नी.दांडेकर' यांच्या 'पडघवली' ला जाणं झालं. ९ वी - १० वी मध्ये अंबीबद्दल फारच थोडं ऐकलं होतं तेव्हापासून तिला भेटायची ईच्छा होती. एकदाची अंंबीला भेटून आले. अंबी ही या कथेतील एक व्यक्ती , जी वाचकाला पडघवलीचं दर्शन घडवते. तिच्यासाठी पत्र.

डिअर अंबी ,

तू माझं म्हणणं ऐकलंस असंच वाटलं , जेव्हा तू गणू भाऊजींंना 'मी नाही जाणार' असं सांगितलंस. गणू भाऊजी , बनू वन्सं यांच्याबरोबर खेळणारी अंबी ते गावची खोतीन , सगळ्या पडघवलीची वयनी ; हा तुझा प्रवास पाहिला की , तुझ्यावरचं प्रेम कसं अजूनच वाढतं बघ. 

अल्लड वयात लग्न करून आलीस. काही - काही कळत नव्हतं ( आक्कीला कामं सांगणं सोडून ) तेव्हापासूनच खोतांची , गावातल्या वडील घराची तू सून. तुझं माहेरपण चालू असतानाही मामंजींनी तुझा ध्यास घेतला , इतक्याश्या वयात सगळ्यांना लळा लावतेस तेव्हा हेवा वाटतो तुझा खरंच. इतकी वर्षं व्यंकू भाऊजी कोणाला कळले नाहीत ; पण तुला पंगत वाढताना तुझ्याकडच्या त्यांच्या एका नजरेत तू त्यांना ओळखलंस आणि जे तू ओळखलंस तेच पुढे सर्वांनी पाहिलं.

'म्हाद्या धांद्रट आहे' हे मामंजींच्या शेवटच्या बोलण्यातले शब्द बरोबर घेरून , त्याचा अर्थ ओळखून संसार सांभाळलास. अंबे जी कुशी आत्या तू रंग्यावर हसलीस म्हणून आत्ते सासुबाईंकडे तुझी तक्रार करायला आली होती तीच कुशी आत्या मरणाच्या घडीवर सगळी व्यवस्था तुझ्याकडे देते तेव्हा मन भारावून येतं. धर्मी सुद्धा किती विश्वासानं तुलाच येऊन बोलते. कशी गं तू अंबे !!

गणू भाऊजी , बनू वन्सं यांच्याशी तुझं वेगळंच सौख्य. भिऊ अण्णाची शारदा देखणी नि तुला ती भारी आवडते हे जेव्हा तू मन्मनी बोलतेस तेव्हा तुझ्यातल्या निरागसतेचं दर्शन होतं गं. गुजा भाऊजीनी तुला एक लेकरू म्हणून शेवटपर्यंत साथ दिली. तुझा नवरा आंब्याची गलबतं बुडाल्याचं कळल्यावर देवाघरी जातो आणि तू उघडी पडतेस पण ; खोतीन म्हणून खंबीर उभी असतेस , हे पाहिलं की वाटतं तुझ्यासारखी अंबी प्रत्येक बाईत हवी. तू अशी आहेस म्हणूनच आत्ते सासूबाईंची जिवाभावाची होतीस. ( आणि आता प्रत्येक वाचकाची सुद्धा )

तुला एक सांगू ? आजकाल सगळ्या पडघवल्या आंबूडी सारख्या झाल्यात. तुझी शप्पथ सांगते , सगळ्या वाटासुद्धा पोरक्या झाल्यात. मुंबई वाढलीये आता. सगळीकडे एक ना एक मुंबई तयार आहे. माड , पोफळी , सुपारी , बागा सारं सारं ओसाड झालंय अंबे. तुझ्या पाण्यावर वरच्या बाजूलाच बांध घातला होता म्हणून तुझ्या बागा कोरड्या पडत होत्या पण ; इथं तर बांध न घालताही सगळं कोरडं पडतंय. तुझ्या घराजवळ कुणाला साधी खोक जरी पडली तरी तुझा सगळा वावर गोळा व्हायचा , इथं कुणी गेलं तरी कुणी कुणाला दखलत नाही. 

एवढं सगळं महाभारत पडघवलीत होऊनही तू कोळ्याच्या काळूला जेव्हा तुझा बोजा बोटीतून उतरायला लावून 'पडघवली सोडणार नाही' म्हणतेस तेव्हा अंगावर काटा येतो. अंबे तुझ्यामुळे साऱ्या पडघवल्या वाचतील , टिकतील ; यात तसूभरही शंका नाही.

( ऋण : वीना देव , विजय देव , मधुरा देव , रुचिर कुलकर्णी )
सदैव नमन गोनीदां _/\_

"Seminar Report : Reforms in Criminal Laws"

One-Day Workshop on : Reforms in Criminal Laws (Under the lead college scheme of Shivaji University, Kolhapur) Date: 18th March 2025 Venue:...