मोगरा फुलला... मोगरा फुलला...
नंदा खूप आत रुतून बसलेय. मनाच्या आत आत डोकावून पाहिलं की दासबाबूंचा आवाज येतो , प्रीतीचा अर्थ सांगणारा तो थोर माणूस मनाला फार फार भावतो. दादा नंदेची पत्रं , तिने लिहिलेले कागदाचे कपटे वाचत , ते फार आवेगाने काळजात आपली जागा तयार करतात. माई आणि मिलिंद नंदाच्या खूप जवळचे आणि हक्काचे , तिला अंततः समजून , उमजून घेणारे.
नंदाचं मृत शेखरमध्ये अडकून राहणं आणि स्वतःला बंदिस्त करून घेणं समोर येतं तेव्हा , कित्येक अडकलेली पाखरं पंख फडफडत पिंजऱ्यात आयुष्य काढत असतील याची प्रचिती येते. आयुष्याला स्वतःच्या क्रूर दोरांमध्ये अडकवून घेऊन साध्य तरी काय होतं ? इतक्या मोठ्या , अनुभवी , थोर माणसांच्या आयुष्याचं सार वाचूनही आपल्या आयुष्यात निरर्थक हेतू ठेवून जगणं म्हणजे एकप्रकारे आत्महत्याच नाही का !
काही काळाने नंदा वसुकडे जाते. काहीतरी बदल म्हणून जाते. दादांनी सांगितलेलं मनात साठवून जाते. स्वतःचं दुःख बाजूला सारायला जाते. मधुरेशी तेव्हा तिची नाळ जुळते. बापू आणि सावित्रीआईसारख्या निरामय माणसांना भेटून नंदा कृतार्थ होते.
हे इथं शब्दांत मांडतानाही धडधड होतेय. कंठ दाटून येेेतोय. नंदा भेटते देवदत्त नावाच्या महाशयांना. पुस्तकांना जीवनाची बाग आणि त्याच पुस्तकांना स्मशान संबोधनारा हा देवदत्त 'चंचल' या त्याच्या हरिणीशी बोलतो 'माझे दोनच मित्र एक तू आणि दुसरा मृत्यू' तेव्हा कोणीही अश्वत्थामी हृदय असणारी व्यक्ती त्याच्यासाठी मेणबत्तीचं मेन गळून जावं तशी गळून जाते. त्याच्या विचित्र असण्याला , त्याच्या अहंकाराला , गूढ तटस्थपणाला , त्याच्या काटेरी असण्याला , विजेसारख्या अस्थिरतेला , त्याच्या साऱ्या साऱ्या रुपांना क्षणात स्वीकारून भाळून जाते. विसं तुम्ही देवदत्त फार फार खोल कोरून बसेल असा निर्माण केलात. तो दुःखी आणि आयुष्याला विटलेला , आत्महत्येच्या कल्पनेने ग्रासलेला असला तरीही त्याच्यावर भरभरून प्रेम करावेसे वाटते.
नंदा जशी त्याच्या प्रेमात न पडता , त्याच्यावर प्रेम करते तसं प्रेम करण्याची ताकद प्रत्येक माणसात आहे ; गरजेचं इतकंच आहे की , वासनेला प्रेम समजून त्या दोहोंचं मिश्रण होऊ देऊ नये. देवदत्त आणि नंदा यांच्यातली प्रीतीची चाहूल वाचकाला ज्या क्षणी जाणवते त्या क्षणी प्रेमाकडे पाहण्याची त्याची वृत्ती पुरी बदलून जाते. नंदा कधी भेटली तर तिला एवढेच विचारेन "देवदत्ताला आत्महत्येच्या सततच्या विचारांमधून तू दूर केलेस खरे पण ; त्याला सहवासाने दूर का लोटतेस तू ? भाऊबीजेला बोलावून ओवळणीत त्याचे अश्रूच का हवेत तुला ? 'सुख माणसांना दुखतं' तसं काही झालं का तुला ?"
एखाद्या कल्पित कथेने श्वास गहिवरून यावेत असा क्षण फार दुर्मिळ असतो ; मात्र इथे तो येतो. तेव्हा शब्द स्तब्ध होतात आणि फक्त डोळे बोलतात , मन भडभडून वाहत असतं ; अबोल राहून. देवदत्तासाठी रडावंस वाटतं. वसू देवदत्ताला भेटण्याअगोदर ; नंदेला खेचून त्याच्याकडे आणावं असं वाटतं आणि त्या लायब्ररीमध्ये ठेवलेल्या दोन प्रतिमांमध्ये मन हरवून जातं... हॅमिंग्वे आणि विवेकानंद...!!
वि. सं. खांडेकर यांची १९६७ साली प्रकाशित झालेली 'अमृतवेल' कादंबरी अवघ्या १६० पानांची. आवर्जून वाचा. वाचून दुःख झालं तर त्या दुःखाने अंतर्मुख व्हाल आणि आत्मपरीक्षण कराल अशी अपेक्षा. आनंदाने सुखी झालात तर , आठवणीने तो आनंद वाटा ; आनंद वाटण्याएवढा आनंद आणखी कशात नाही !

अमृतवेल'
ReplyDeleteमनुष्याच्या मनाला कधीच भूतकाळाच्या आठवणीने जखडून ठेवता येत नाही.
एखाद स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यात उतरावे म्हणून प्रयत्न करणं आणि कधी दुर्दैवाने ते स्वप्न भंग झालं तरी नव्या उमेदीने नवे स्वप्न रंगवणे हा मनुष्याचा स्वाभाव...
मनुष्याच्या मनाचा अचूक वेध घेणारी ही वि. स. खांडेकर यांची खूप गाजलेली कादंबरी... प्रत्येकाने वाचलीच पाहिजे..
( परिस्थितीशी जुळवून घेत आयुष्य जगणं म्हणजे " अमृतवेल ")