Friday, June 11, 2021

अंबी



१० जून २०२१ रोजी 'गो.नी.दांडेकर' यांच्या 'पडघवली' ला जाणं झालं. ९ वी - १० वी मध्ये अंबीबद्दल फारच थोडं ऐकलं होतं तेव्हापासून तिला भेटायची ईच्छा होती. एकदाची अंंबीला भेटून आले. अंबी ही या कथेतील एक व्यक्ती , जी वाचकाला पडघवलीचं दर्शन घडवते. तिच्यासाठी पत्र.

डिअर अंबी ,

तू माझं म्हणणं ऐकलंस असंच वाटलं , जेव्हा तू गणू भाऊजींंना 'मी नाही जाणार' असं सांगितलंस. गणू भाऊजी , बनू वन्सं यांच्याबरोबर खेळणारी अंबी ते गावची खोतीन , सगळ्या पडघवलीची वयनी ; हा तुझा प्रवास पाहिला की , तुझ्यावरचं प्रेम कसं अजूनच वाढतं बघ. 

अल्लड वयात लग्न करून आलीस. काही - काही कळत नव्हतं ( आक्कीला कामं सांगणं सोडून ) तेव्हापासूनच खोतांची , गावातल्या वडील घराची तू सून. तुझं माहेरपण चालू असतानाही मामंजींनी तुझा ध्यास घेतला , इतक्याश्या वयात सगळ्यांना लळा लावतेस तेव्हा हेवा वाटतो तुझा खरंच. इतकी वर्षं व्यंकू भाऊजी कोणाला कळले नाहीत ; पण तुला पंगत वाढताना तुझ्याकडच्या त्यांच्या एका नजरेत तू त्यांना ओळखलंस आणि जे तू ओळखलंस तेच पुढे सर्वांनी पाहिलं.

'म्हाद्या धांद्रट आहे' हे मामंजींच्या शेवटच्या बोलण्यातले शब्द बरोबर घेरून , त्याचा अर्थ ओळखून संसार सांभाळलास. अंबे जी कुशी आत्या तू रंग्यावर हसलीस म्हणून आत्ते सासुबाईंकडे तुझी तक्रार करायला आली होती तीच कुशी आत्या मरणाच्या घडीवर सगळी व्यवस्था तुझ्याकडे देते तेव्हा मन भारावून येतं. धर्मी सुद्धा किती विश्वासानं तुलाच येऊन बोलते. कशी गं तू अंबे !!

गणू भाऊजी , बनू वन्सं यांच्याशी तुझं वेगळंच सौख्य. भिऊ अण्णाची शारदा देखणी नि तुला ती भारी आवडते हे जेव्हा तू मन्मनी बोलतेस तेव्हा तुझ्यातल्या निरागसतेचं दर्शन होतं गं. गुजा भाऊजीनी तुला एक लेकरू म्हणून शेवटपर्यंत साथ दिली. तुझा नवरा आंब्याची गलबतं बुडाल्याचं कळल्यावर देवाघरी जातो आणि तू उघडी पडतेस पण ; खोतीन म्हणून खंबीर उभी असतेस , हे पाहिलं की वाटतं तुझ्यासारखी अंबी प्रत्येक बाईत हवी. तू अशी आहेस म्हणूनच आत्ते सासूबाईंची जिवाभावाची होतीस. ( आणि आता प्रत्येक वाचकाची सुद्धा )

तुला एक सांगू ? आजकाल सगळ्या पडघवल्या आंबूडी सारख्या झाल्यात. तुझी शप्पथ सांगते , सगळ्या वाटासुद्धा पोरक्या झाल्यात. मुंबई वाढलीये आता. सगळीकडे एक ना एक मुंबई तयार आहे. माड , पोफळी , सुपारी , बागा सारं सारं ओसाड झालंय अंबे. तुझ्या पाण्यावर वरच्या बाजूलाच बांध घातला होता म्हणून तुझ्या बागा कोरड्या पडत होत्या पण ; इथं तर बांध न घालताही सगळं कोरडं पडतंय. तुझ्या घराजवळ कुणाला साधी खोक जरी पडली तरी तुझा सगळा वावर गोळा व्हायचा , इथं कुणी गेलं तरी कुणी कुणाला दखलत नाही. 

एवढं सगळं महाभारत पडघवलीत होऊनही तू कोळ्याच्या काळूला जेव्हा तुझा बोजा बोटीतून उतरायला लावून 'पडघवली सोडणार नाही' म्हणतेस तेव्हा अंगावर काटा येतो. अंबे तुझ्यामुळे साऱ्या पडघवल्या वाचतील , टिकतील ; यात तसूभरही शंका नाही.

( ऋण : वीना देव , विजय देव , मधुरा देव , रुचिर कुलकर्णी )
सदैव नमन गोनीदां _/\_

1 comment:

  1. असेच सुंदर लिहीत रहा...
    😇

    ReplyDelete

"Seminar Report : Reforms in Criminal Laws"

One-Day Workshop on : Reforms in Criminal Laws (Under the lead college scheme of Shivaji University, Kolhapur) Date: 18th March 2025 Venue:...