डिअर नाग्या ,
कमालीचा ढोलीया आहेस यार नाग्या तू ! उगाच का चिंधी सगळं सोडून तुझ्याकडे आली !! आयशीच्या पोटात असल्यापासून तुझं जणू प्रशिक्षण चालू होतं ढोलीया बनण्याचं. बा सोबत रानात जाऊन रोज एकेक विद्या जणू गोळा करत होतास. तसा तू भगत पण लिंगोबाशी तुझा वेगळाच मैतर गड्या !
नाग्या , तुला माहितीये का अख्या ठाकरवाडीच्या इतिहासात कुणी जे केलं नाही ते तू केलंस ; कुणामुळे माहितीये का , तुझ्या बा मुळे ! बा नं तुला पुण्यवंत होण्याचा मंत्र दिला , तू तो उगाळून प्यायलास म्हणून हे अद्भूत शक्य झालं. चिंधीच्या तुझ्याविषयीच्या प्रेमामुळे तिनं शेवटी तुला जखमाळलेल्या अवस्थेत 'राणी माशी उडाली , तुझा जैत झाला नाग्या' सांगितलं , तेव्हा नकळत सोबतीन असण्याचा अर्थ कळून जातो.
तू निश्चय केलास , तुला राणी माशी डंकली म्हणून तू राणी माशीला डंकलास ; नाहीतर जो नाग्या राणी माशी कधी दिसलीच तर तिला डोकं टेकून पाया पडायचा तो का बरं त्याच राणी माशीच्या जीवावर उठेल. पण नाग्या प्रचंड निश्चयी आहेस रे तू. हा यावरून आठवलं , झाडावर चढण्याआधी तू जमिनीवर डोकं टेकून म्हणायचास , '' झाड देवा , हिरव्या ढाप्याला धक्का सुद्धा लावणार नाही , वाळलेली काडी बघून बघून काढून घेतो , काय चुकलंच तर माफ कर ''. लिंगोबाच्या डोंगरावर चढतानाही तेच , कितीवेळा माफी मागितलीस. तुझ्या बा ला साप चावला आणि बा देवाघरी गेला तेेव्हाही तू सापाला जाब विचारलास , ''जेव्हा जेव्हा रानात तू दिसलास तेव्हा तुझ्या पाया पडलो , तुझ्या वाटेतून बाजूला झालो ; माझं काय चुकलं म्हणून आज माझ्या बा ला तू डकलास साप देवा ? '' ( मुक्या जीवाला मारणं खूप दूर , दुखावनं सुद्धा तुझ्याच्याने शक्य नाही बघ ) निसर्गासोबतचं तुझं हे नातं अचंबित करणारं आहे रे.
डोळा फुटलेला , रूप कोलमडलेलं असलं तरी जीव ओवाळून टाकणारी चिंधी , तिला सोबत घेऊन पुण्यवंत बनायला निघालेला तू. भल्या मोठ्या बैलावर बसलेला म्हादेव बघून तुला भगवंताचं दर्शन घ्यायचं होत खरं पण बा च्या शिकवणीला अर्थही लावायचा होता. कमालीचा ढोलीया तू , ठाकरांचा लाडका भगतही तू , चिंधी सारखी सोबतीन मिळणारा नशीबवानही तूच आणि लिंगोबानं कुशीत घ्यावं , सतत तुझ्या जवळ राहावं इतका पुण्यवंतही तूच !
निसर्गाला देव म्हणणारा तू , तुझ्यासारखं निसर्गाला जपणं आम्हाला जमेल का रे ? हिरवीगार झाडं तोडताना आम्ही माफी कधी मागणार ? डोंगर खोदताना आम्हाला त्यात देव कधी दिसणार ? नाग्या लिंगोबाच्या एका बाजूला झाडं , डोंगर , लहान-सहान जीव , सर्प-नाग यांची माफी मागणारी , त्यांना दुखावू नये म्हणून काळजी घेणारी तुझी ठाकरवाडी होती आणि त्याच लिंगोबाच्या दुसऱ्या बाजूला कोरडी , भकास आणि बेफिकीर वाढत चाललेली एक दुनिया आहे ; नाग्या , ठाकरवाडीची ही बुद्धी आम्हाला कधी प्राप्त होईल का रे ?
( ऋण : वीना देव , विजय देव )
सदैव नमन 'गोनीदां' _/\_

Very well written
ReplyDeletekhup chan
ReplyDelete