Monday, January 8, 2024

सत्यशोधक


आज कपिल सरांचा ग्रुपवर मेसेज पाहिला, "शाहू टॉकीज ला आजचा शो बघायला कोण येतंय का?" रविवारच्या धावपळीत असणारी मी , अचानक जागी झाले... ते सरळ मग तिकीट online बुक केल्यावर शांत झालं डोकं. पण ; काय असेल , कसं असेल.. या अशा उत्साहात मन उतू जात होतं हेही तितकंच खरंय. 


सिनेमा चालू झाला..... 'Rights of Man' ज्योतिबांनी वाचायला घेतल्यापासून भरून आलेलं मन सांभाळता येतंच नव्हतं. अंगावर शहारे.. गळ्यात आवंढा .. डोळ्यांत पाणी आणि मनात निस्सीम अभिमान.. असं सारं रूप. 


बाहेर आल्यावर यावर कसं react व्हावं हेच कळत नव्हतं.... आजचे आम्ही जे आपापल्या आयुष्याच्या मागे लागलेले आहोत ते पाहिले की लाज वाटते स्वत:ची .... आजचे आम्ही प्रेम, जबाबदारी , इ मोठाल्या गप्पा मारतो आणि 'साऊ-ज्योति चे कपल गोल्स' आमच्या सनकन कानाखाली वाजवून जातात. कष्टाच्या घामाच्या वासाला जर आज आपण unhygeinic म्हणत असू तर; कुठेतरी गफलत होतेय, कष्टाला न्याय मिळवून देणारे आपण कसे पुढे जाणार हे निर्माणकारालाच माहीत!!

  

आपण आपल्या डोळ्यांसमोर काहीतरी चुकीचं होताना ते फक्त पाहत कसं बसायचं ? बा ज्योतिबा तुला हे कसं जमायचं ? साऊला शिकवताना तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून डोळे भरून गेले. बा, लहुजी वस्तादांनी तुला दिलेली साथ पाहून उर भरून आला. जेव्हा माणसांना विटाळ समजणारी लोकं आजूबाजूला असतात तेव्हा , असे शंभर लहुजी जोडीला असलेच पाहिजेत असं मनोमनी वाटलं. 


बा , तुझं साऊवरचं प्रेम आणि तुमच्या दोघांचं समाजावरचं प्रेम पाहून , आताच्या आमच्या पिढीच्या प्रेमाची कीव आली रे !  बा ज्योतिबा तुला धर्म इतका सहज सोपा आणि  निर्भीड मांडताना पाहिलं की, अंगावर काटे येतात. नातूंच्या गरोदर काशीला वाचवायला तू पाण्यात उडी मारलीस आणि रात्री तिला घरी घेऊन गेलास , दारावर ठोठावता साऊ दार उघडते आणि ; 'ही आत्महत्या करायला निघाली होती' म्हटल्यावर साऊ जेव्हा तिला जवळ घेते तेव्हा आपोआपच डोळ्यांतून पानी येतं. बा , म्हारा-मांगांच्या पोरांना , शूद्र अति शूद्रांना तू आपलंसं केलेलं पाहिलं की जगाला मिठीत घेणारा तू दिसतोस. एका लहान मुलीचं देवाशी लग्न लावताना पाहिल्यावर , ते थांबावं, चुकीचं जे काही समोर घडतंय ते रोखावं म्हणून तू केलेली धडपड पाहिली की वाटतं .... आम्ही तुझे वारस , तुझ्या विचारांचे वारस आज कुठेतरी कमी पडतोय बा ! तुझं शेतकऱ्यांसाठी झटणं.... धरणावर होणारा काळा बाजार बेधडकपणे थांबवणं.... आणि बा, बालविधवांची बाळं जेव्हा तू स्वीकारतोस तेव्हा तुझ्यावरचं प्रेम भरभरून वाहू लागतं .... तुला समाजासाठी , गोर-गरिबांसाठी आटापिटा करताना पाहिलं की वाटतं बा तू परत यावास.... थोडा काळ आमच्यात राहावंस.. आम्हाला शिकवावंस... व्यवस्थेला वठणीवर आणायला !! 


बा, आम्ही प्रयत्न करतोय. तुझे विचार आज चिरंतन चळवळ म्हणून चालतायंत .... ही चळवळ पुढे आणखी दृढ होईल ; अशी तुला आशा देते आणि थांबते. love you ज्योति - साऊ !!


तू सांगितलेला सत्यशोधक स्वतःमध्ये शोधणारी तुझी लेक,

शामलदीपा 

No comments:

Post a Comment

"Seminar Report : Reforms in Criminal Laws"

One-Day Workshop on : Reforms in Criminal Laws (Under the lead college scheme of Shivaji University, Kolhapur) Date: 18th March 2025 Venue:...