१९३९ मध्ये प्रकाशित झालेली , मराठी साहित्यातील पहिले 'ज्ञानपीठ' मानकरी , 'ययाती'कार विष्णू सखाराम खांडेकर यांची 'सुखाचा शोध' ही कादंबरी म्हणजे मराठी साहित्यातील मानाचा तुरा आहे. विसं म्हणजे सर्वकाळ प्रेम करावं अशी जीवनदायी लेखनसमृद्धी ! मनुष्यजीवनातील त्रिवेणी संगम म्हणजे 'सुखाचा शोध' याचं कथानक.
या कथेत 'आनंद' त्याचा मोठा भाऊ 'आप्पा' , आप्पाची मुलं 'मीरा' आणि 'बाळ' , 'आई' , आनंदची बायको 'माणिक' , माणिकचा मित्र 'धनंजय' , आनंदची भक्त 'उषा' आणि एक नटी 'चंचला' या व्यक्तिरेखा आहेत.आप्पा हा माणूस म्हणजे 'आजारी पत्नीस , तुझ्याहूनही माझी मातृभूमी आजारी आहे' असं रोखठोक सांगणारा मात्र ; कीर्तीच्या वाऱ्यात नाती आणि घर विसरलेला मनुष्य. आप्पाची दोन मुलं आईविना ; त्यामुळं मीरा आणि बाळ यांना आनंदाचेच अधिक लाड असत. आप्पाचा सर्वाधिक वेळ हा सभा , संमेलनं , व्याख्यानं यातच. आप्पा म्हणजे प्रसिद्धीची चादर पांघरलेला समाजसेवक. आई देवाघरी गेल्यामुळे व्याख्यानं खोळंबलीत म्हणून त्याच आईवर खापर फोडणारा अवलिया.
भय्या हा आनंदाच्या वारलेल्या बहिणीचा मुलगा ज्याचा सांभाळ आनंदाच्या आईने उचलला होता. त्याला भारी सिनेमांचा नाद. चंचला नावाची नटी त्याला भुरळ पाडी. तो नेहमी नट्या आणि सिनेमांमध्येच रमलेला असे.
आई म्हणजे थोडक्यात आनंद मानून समाधानानं जगणारी धीट बाई. मुलगी गेल्यावर जावयाशी भांडून नातवाला आपल्याकडे तिनेच आणलं होतं. आनंदावर तिचा फार फार जीव. आनंदही तिच्यासाठी , तिला हवे ते करायला तयार असे. मात्र आनंदाचे लग्न उरकून होते न् होते ; आई देवाघरी जाते.
उषा म्हणजे भावबंधांच्या दोन्ही टोकांकडून वंचित राहिलेली निर्विकार मूर्ती. स्वतःच्या आयुष्याच्या भोगांचा अतिरेक झाल्यावर त्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी बोटीवरून जीव देताना आनंद तिला वाचवतो आणि पुढे ती तिच्या देवाला म्हणजेच आनंदला वाचवते. उषा फार कमी बोलूनही , फार खोलवर मृदुमयरित्या वाचकाच्या मनावर रुतून बसते. अखेरीस माणिकच्याही !
माणिक ही पाण्याखाली दबलेल्या बोटीच्या अर्ध्या भागासारखी ! ना तिला कधी वर येता आले , ना तिला कधी पूर्ण डुंबता आले. किनारा येईतोवर ती दबून राहिली आणि साऱ्या सुखाला मुकली. धनंजयच्या न येणाऱ्या सादेला हाकारत आनंदसोबतच्या संसारसुखाला डावलून अधुरी जगली. खरंतर माणिक गृहितकांच्या खेळात अडकून गेली. मनाप्रमाणे एकही गोष्ट होईना तेव्हा उषेच्या निस्वार्थ 'असण्या'ने खजील होऊन स्वतःच्या सुखाला अखेरीस माणिकने स्वीकारले.
चंचला ही वेश्येच्या आवरणातून एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या दुनियेत रमली खरी पण ; अंतापर्यंत सुखाच्या फक्त शोधातच राहिली. स्वतःच्या सौंदर्यावर स्वतःच भाळून आयुष्याला जुगार समजणारी चंचला नेहमी असमाधानीच राहते तेव्हा तिच्यावर दया येते. ना तिला माणिकची बुद्धी होती ना तिच्यात उषेचा निर्विकार अंश. ती वाहत राहिली आणि दुसऱ्याला उध्वस्त करण्याच्या प्रयत्नात स्वतः उध्वस्त होत गेली.
आनंद हा व्यक्तिगत सुख बाजूला ठेवून कौटुंबिक आणि सामाजिक सुखाचा विचार अधिक जवळून करणारा अळवावरचा थेंब म्हणावा लागेल. त्याची स्थिरता उषेमध्ये होती हे कळायला आनंदाला फार फार अस्थिरतेचा प्रवास करावा लागला. दिव्यातलं तेल संपलं की , दिवा जळणं थांबवतो तसंच काहीसं आनंदचं झालं ! माणिक , चंचला की उषा यात त्याची फरफट झाली. सुखाच्या शोधात कैक दुःखं त्यानं पचवली. तरी त्यानं सुख पेरणं राहू दिलं नाही ; तो सुख पेरत गेला आणि उषेच्या असण्यात ते उगवत गेलं. उषा प्रत्येकवेळी खिंडीत कोसळणाऱ्या आनंदला वाचवणारी शिडी होती. त्यांच्यातले दहाचे ठोके भक्तिरूपी प्रेमाला दृढ करत राहतात हेही तेवढेच खरे !
कधी कधी शब्दांचं वाहणं पुरं आटून जातं , तसं ही कादंबरी वाचल्यावर होऊन जातं. त्यातला सारा सार पिऊन तो प्रतिबिंबित करणं भारी जड जातं. म्हणून ; या कादंबरीतील भावलेले शब्दसंघ , कुठेतरी कोरून ठेवावीत अशी वाक्यं , इथे मांडण्याचा प्रयत्न करतेय ; आपल्यालाही ते जीवनमंत्र मोहून टाकतील यात शंकाच नाही.
"पानांआडून डोकावणारी कळी किती मनोहर दिसते , विरळ धुक्यातून चंद्रकोर किती मोहक वाटते , लाजेने तरुणीही आकर्षक होत असावी."
"नंदादीपापासून , विजेच्या दिव्यापर्यंत घरात दिवे असतात पण ; खिडकीतून हळूच आत येणाऱ्या चांदण्याचा आनंद या दिव्यांच्या प्रकाशात नसतो."
"उषा हे माझ्या दृष्टीने देवाला वाहिलेलं फुल होतं ; ज्याला हात लावायचा नाही , ज्याचा वास घ्यायचा नाही , अशा फुलाच्या दर्शनाने कोण सुखावील ?"
"पुरुषाचा मोठेपणा घराबाहेर असतो , घरात तो लहानच असतो."
"प्रेम हे मद्य आहे. प्रेम हे मृगजळ आहे."
"तरुणी हे गुलाबी कोडं आहे."
"मनातल्या मनात प्रत्येकजण कवी असतो ; कोणी कविता करतो , कोणी करत नाही एवढाच काय तो फरक !"
"आयुष्य हा जुगार आहे."
"ज्याचा आग्रह करावा अशी एकच गोष्ट आहे या जगात 'सत्य' ."
"केवळ स्वतःसाठी जगणं ही आत्महत्या आहे."
"सवडीनं येणारी माणसं परत कधीच येत नाहीत."
"काही माणसं अभिमानावर जगतात , पैशावर नाही."
"मनुष्याने बेभान होऊन जखम करणं निराळं आणि आपण केलेल्या जखमेतून वाहणारं रक्त शांतपणे पाहणं निराळं."
"सौंदर्य कधी कधी भयंकर असतं."
"आयुष्य हा खेळ नाही , लढाई आहे."
"गुलामाला हक्क नसतात हेच खरं."
"त्यागानं देवता प्रसन्न होतात , भुतं नाहीत."
"जिवंत मन मर्यादा जाणत नाही."
"काही सावज पकडता येत नाहीत."
"जीवन दुःखमय आहे तरी , मनुष्य किती धडपड करतो ; त्याचं ते धडपडत जगणं काजव्याच्या लुकलूकण्यासारखं असतं."
"स्त्रीचं सारं पावित्र्य तिच्या पदरात असतं."
"जीवाला जीव द्यायचा असतो , मातीला जीव नाही."
"समाजसेवा हा कित्येकांना कीर्तीचा राजमार्ग वाटतो.
शेंदूर लावलेला दगड पाहिला की , लोकांचे हात आपोआप जोडले जातात.
त्यागाशिवाय खरी समाजसेवा जगात शक्य नाही."
"दुसऱ्याचं दुःख हलकं करण्यात केवढा आनंद असतो."
"सेवा जग फुलविते आणि प्रीती मन फुलवते."
"जगात तात्काळ मिळणारी खूप विषं असतात."
"प्रिय माणसापासून आनंदाने कुणी दूर जाईल का !"
"आयुष्य हे गणिताच पुस्तक नाही , ती एक विचित्र कादंबरी आहे."
"स्त्रीचा शृंगार पुरुषांच्या सुखाकरिता असतो , अंगावरले दागिने या तिच्या गुलामगिरीच्या शृंखला असतात."
"माणसाचं आयुष्यं थोडंतरी कादंबरी सारखं असावं."
"पेरल्याशिवाय उगत नाही हा नियम सुखलाही लागू आहे."
"दुःख हेच मनुष्याला लवकर अंतर्मुख करत."
" 'त्याग' हा प्रीतिमंदिराचा 'कळस' आहे आणि 'भोग' हा 'पाया' आहे."
"समाजसेवा हे प्रीतीचेच विशाल रूप आहे."
"प्रेम हाच या जगातला परमेश्वर आहे."
"खालच्या वर्गाची सेवा करायची तर , आपल्या वर्गाचा अभिमान सोडावा लागतो."
"सुख दोनच माणसांच्या जगात असतं."
( ऋण - मिलिंद फाटक )
'विसं' सदैव नमन _/\_
पुस्तकाचे नाव - ''सुखाचा शोध''
लेखक - 'विष्णू सखाराम खांडेकर'
पृष्ठे - ११२
मूळ प्रकाशन वर्ष - १९३९
सद्य प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस
स्टोरीटेल प्रदर्शन - २०१९ मिलिंद फाटक यांसोबत.
स्टोरीटेल अभिवाचन कालावधी - ०३ तास १० मि.

' सुख ' या एका शब्दाभोवती जग फिरते आहे.
ReplyDeleteजगातील प्रत्येक व्यक्तीला सुखाची अपेक्षा आहे आणि दुःखाविषयी घृणा आहे. पण ते आल्याशिवाय रहात नाही.
एखाद्या व्यक्तीला केवळ सुखच मिळत राहिले तर ते सुख सुख राहणार नाही. त्याचा जोडीला थोड़े दुःख असेल तरच त्याला सुखाची किंमत कळेल..