Tuesday, June 15, 2021

बनगरवाडी


                              'व्यंकटेश माडगूळकर' यांचे नाव मराठी साहित्यिक , रसिक आणि वाचक मोठ्या आदराने घेतात. माडगूळकरांची शैलीच एवढी न्यारी. वाचणाऱ्याने भान हरवून माडगूळकर म्हणतात तिथे गेलंच पाहिजे अशी त्यांची ठेवण. आणि मग शेवटचं पान पलटलं की , आपण जागे होतो आणि राहून राहून माडगूळकरांच्या प्रेमात पडतो. १४ जून २०२१ रोजी 'व्यंकटेश माडगूळकर' यांची 'बनगरवाडी' ही कादंबरी वाचली. १९५५ साली लिहिलेल्या या कादंबरीवर आधारित चित्रपटही १९९५ ला प्रदर्शित झाला. ही कथा एक शाळा मास्तर आणि एक वाडी यांच्यातील कथानक आहे.

                              राजाराम नावाचा तरुण , उमदा शिक्षक बनगरवाडीला रुजू होतो. हळूहळू तिथे रमून जातो. मुलांना शिकवायला गेलेला हा शिक्षक माणूस गावचा आधार बनतो. गावातली पोरं सोरं , म्हातारी माणसं सगळी सगळी मास्तरच्या भोवतीने ! मास्तरनी हा अधिकार आणि मान गावातल्या माणसांच्या नडीला येऊन मिळवलेला असतो. कालांतराने मास्तर गावचा माणूस होऊन जातो. अडल्या गावकऱ्याच्या कामाला येणं , गावकऱ्यांंची मर्जी सांभाळणं , कारभारीच्या मदतीने सगळे निर्णय घेणं , आयबू सारख्या एकट्या मुलाला घरातल्या माणसाप्रमाणे मास्तर वागवत , रामाचे पैसे मोडून आणणे , आनंदा रामोशी म्हणजे वेगळीच कमाल आणि शेवटी तालीम बांधवून घेणे अशा कैक आठवणी , सुसंवाद , आपुलकी बनगरवाडी सोबत झाली होती मात्र ; शेवट फारच उदास करून जातो. दुष्काळात बनगरवाडी पोरकी होते. कुणी कुणी गावात उरत नाही. काकोबा एकटा असतो त्याला रामराम करून शेवटी मास्तरही तालुक्याच्या गावात बदली होऊन जातात.

                             हा एकूण प्रवास इतर कुणी सांगण्यापेक्षा किंवा लिहिण्यापेक्षा माडगूळकरांच्या लेखणीतून वाचणं म्हणजे एक सुखद अनुभव ! कारभारी कसा तत्वाला धरून आहे , त्याची आंजी कशी आहे , रामा बनगर माणूस म्हणून कसा आहे , नडीला चोरी करून नंतर येऊन स्वतःच खुलासा करणारा आनंदा कसा आहे , आयबू , शेकू , शेकूची बायको , जगन्या , रामोशी वाडी , वांगीची लोकं , दादू बालट्या , गावाबाहेरचा बाळा आणि मेंढक्यांची लेकरं म्हणजे 'शेरडं' त्यांचं रोजचं जगणं , वाडीतला रोजचा प्रत्येक प्रहर आणि वाडीतल्या रीती भाती जसं की , एकाचवेळी सगळ्या गावची सगळी लग्नं उरकण्यामागचं कारण असो किंवा देवीची यात्रा असो की , गावातल्या गावात न्याय होत नसेल तर अख्ख्या धनगरांच्या वडीलधाऱ्यांना बोलावणं घालणं असो अशा कित्येक गोष्टी वाचकाला बनगरवाडीकर बनवून जातात.

                             मनाला खूप भावते ती माडगुळकरांनी वर्णिलेली बनगरवाडी ! म्हणजे अगदी गुण्यागोविंदाने राहणारं गाव जेव्हा कोरडं पडलेलं समोर दिसतं तेव्हा जाणवतं बनगरवाडी मराठी साहित्यातील मानाची , श्रेष्ठ कादंबरी का आहे ते ! म्हणून वेळ काढून बनगरवाडीला एकदा तरी जाऊन आलंच पाहिजे.

( ऋण : चंद्रकांत कुलकर्णी )
सदैव नमन 'माडगूळकर' _/\_

1 comment:

"Seminar Report : Reforms in Criminal Laws"

One-Day Workshop on : Reforms in Criminal Laws (Under the lead college scheme of Shivaji University, Kolhapur) Date: 18th March 2025 Venue:...